ईश्वरेच्छा !
काल सद् गुरू गुरूनाथजी मुंगळे यांच्या ” ईश्वरेच्छा ” या चरित्र ग्रंथाच्या लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला.
मुंगळे सर, अर्थात् बाबांनी त्यांच्या जीवनात कमावलेली मौलिक संपदा म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी खूप मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होती.यातले अनेक लोक खूप दुरून प्रवास करून आले होते.
गंमत ही आहे, की स्वतः मुक्त जीवन जगणाऱ्या बाबांनी या सगळ्यांना आपल्या दैवी प्रेमाच्या रज्जुंनी अगदी घट्ट बांधून ठेवलं.हे ईश्वरी प्रेमाचे बंध बाबांनी देहत्याग करूनही यत्किंचितही विसविशीत होणार नाहीत,याची खात्री कालच्या समारंभात पटली.
बाबांची लाडकी लेक डॉ.गौरी कहाते,व बाबांचे दोन्ही जावई श्री.केदार कहाते व श्री.अजय देशपांडे यांनी खूप परिश्रम घेवून हा योग घडवून आणला.
बाबांशी वैयक्तिक स्नेह असलेले करवीर पीठाचे शंकराचार्य श्री.विद्यानृसिंह भारती हेही या ग्रंथविमोचनासाठी उपस्थित राहिले.
या भावपूर्ण कार्यक्रमात बाबांचे अनेक शिष्य, चाहते, यांनी बाबांच्या सांगितलेल्या हृद्य आठवणी क्षणाक्षणाला डोळे ओलावणा-या होत्या.
सध्या जो समाज अगदी कौटुंबिक नातेसंबंध ही ओझे असल्याप्रमाणे भावनिक शुष्कता अनुभवतो आहे,त्याच्यासाठी बाबांनी जन्मोजन्मी प्रेमाने असंख्य माणसे कशी जोडता येतात याचा वस्तुपाठच समोर ठेवला आहे.
परमार्थात देहत्याग म्हणजे निघून जाणे नव्हे, तर देहाचे बंधन टाकून सर्वांच्या भावविश्वात सद्गुरूंनी सहज संचार करीत मी नित्य तुमच्या सोबत आहे,याची दिलेली प्रचिती असते.
भेटायला येणा-या प्रत्येकाच्या भावावस्थेशी सहज समरस होणं,त्यांचे अंतरंग आणि स्वभाव ओळखून त्यास सुसंगत साधना मार्ग त्यांना सांगणं,ते प्रापंचिक दुःखात पिचत असतील तर त्यांना धीर देणं,त्यांचं सांत्वन करणं,त्यांचे मन मोकळं होवून तणाव निवळेल या उद्देशाने त्यांचं म्हणणं, समस्या शांतपणे ऐकून घेणं, त्यांना पटतील अशी उदाहरणे देवून त्यांच्या जीवनात उभारी येईल असा आशादायक संवाद बाबा करीत असत.
या संवादात कधी निखळ विनोदाची पखरण असे,कधी साहित्यातले दाखले,संतवचने आणि त्याची वर्तमान काळाशी सुसंगती,महान दार्शनिकांनी सांगितलेली वैश्विक सत्य, अशा असंख्य विषयांवर बाबांचा संवाद रंगत असे.
काही कमी शिकलेले, श्रमजीवी,तर काही अत्यंत बुद्धिमान, चिकित्सक लोक बाबांना भेटत.काही अत्यंत सश्रद्ध तर काही अगदी तर्क कर्कश्श म्हणावेत असेही लोक भेटत.कधी कलाकार, कधी राजकारणी, कधी पत्रकार, काही साधक,तर काही सिद्धी अवगत असणारेही बाबांच्या भेटीस येत.लौकिकाच्या कामनेसाठी अजाणताही सिद्धींचा दुरूपयोग झाला,तर किती किंमत मोजावी लागेल, हे बाबा त्यांना निक्षून सांगत.
यातल्या प्रत्येकाशी प्रेमाचा संवाद, तर्कसंगत चर्चा,तर धर्मातील तत्व हडसून खडसून गळी उतरवणं जिथे जरूरीचे आहे, तिथे तसे बाबा बोलत असत.
बाबांचा हसरा चेहरा, डोळ्यातील काही वेळा अगदी बालकासारखे निरागस, खोडकर भाव, वागण्यात आत आणि बाहेर पूर्ण अद्वैत, उक्ती,कृतीत थोडाही अंतर्विरोध नाही, असे एक अजब रसायन होते बाबांचे व्यक्तिमत्त्व.
कोणाला न सांगताही सहज लक्षात येईल, असे साधनेचे विलक्षण तेज बाबांच्या चेह-यावर झळकत असे.ज्या सहजतेने बाबा मुक्तपणे गप्पा मारत, त्यामुळे त्यांच्या व्यक्तित्वाची गहनता,त्यांचा आध्यात्मिक अधिकार, लक्षात येणं खूप अवघड होतं.
” रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा,
गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा ” अशा अनंतरंगी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या बाबांनी क्षणात या जगाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली, त्यामुळे अनेकांना जो धक्का बसला, त्यातून अजूनही सावरणं अनेकांना जमलं नाही.
देह ठेवण्याच्या आदल्या दिवशी बाबा गौरीला म्हणाले ” मी आता कायमचा तुझ्या सोबत असेन.” हे एकच वाक्य बाबांचा देहत्याग करण्याचा निश्चय आपल्याला समजायला पुरेसे आहे.
अथर्व ज्ञानपीठ च्या माध्यमातून प्रकाशित केलेली बाबांची ग्रंथ संपदा त्यांचा सहवास आपल्याला घडवेलच.
कालच्या कार्यक्रमात बाबांबद्दल भरभरून बोलताना अनेकांच्या भावनांचा बांध फुटला, त्यांना आणि ऐकणा-या सर्वांचीच मने गलबलून आली.
बाबा प्रत्यक्ष आपल्या सोबत असण्याचे आणखी काय वेगळे प्रमाण आता हवे ?
अभय भंडारी, विटा.