आयुष्य हे वाहत्या पाण्यासारखं प्रवाही पाहिजे. कितीही अडचणी आल्या , आव्हाने आली तरीही प्रत्येक आव्हान ही एक संधी म्हणून समजा आणि त्यातूनच तुम्हांला ब-याच गोष्टी शिकायला मिळतील अशा विचारसरणीचे माझे वडील, श्री.गुरूनाथ मुंगळे! स्वभाव निर्भीड, मतं ठाम, विचार स्वच्छ, जसं बोलतील तसच वागतील .अत्यंत पारदर्शक असं त्यांच व्यक्तिमत्त्व होतं.

मराठी, इंग्रजी व संस्कृत साहित्याचा प्रचंड अभ्यास , संग्रह आणि पाठांतराची आवड , बोलका स्वभाव, कोणालाही मदतीसाठी सदैव तत्पर , फटकळ पण लाघवी असे व्यक्तिमत्त्व.त्यामुळे पहिल्यापासूनच लोकसंग्रह प्रचंड!!अध्यात्मिक , पौराणिक ग्रंथांचाही प्रचंड व्यासंग; पण बंडखोर  मनोवृत्तीकडे कायमच पारडं झुकलेलं! त्यांच्या कर्तुत्वाचा संपूर्ण आलेख व्यक्त करणं या छोट्या लेखात शक्य नाही पण, काही महत्वाच्या गोष्टींच स्मरण करताना, अनेक लेखक, कवी , साहित्यकार, विडंबनकार , शाहिर, किर्तनकार , कथालेखक, राजकारणी मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपटदिग्दर्शक, शिक्षणतज्ञ,अनुवादक, समीक्षक,पत्रकार त्यांच्या संपर्कात येऊन गेले . त्यांच्यात एक अद्भुत गुणसमुच्चय होता. त्यांच्यावर प्रेम करणारी माणसे आहेत पण  त्यांच्या परखड स्वभावाने नकळतपणे कटू वाग्बाणांनी दुखावलेली माणसेही आहेत.

लहानपणापासून साहित्यावर अपरंपार प्रेम , नाविन्याचा ध्यास, एखादी गोष्ट मनात आली की ती मिळवण्यासाठीचा अट्टाहास, पाठांतराचा ध्यास, अनेकदा आक्रमक होणारी वाणी त्यामुळे बरेचदा लोकं  सुरुवातीला घाबरत असत.स्वतः च स्वतःला घडवण्यावर त्यांचा विश्वास होता.कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वयाची मर्यादा आहे हा नियम त्यांना मंजूर नव्हता.स्मरणशक्ती जबरदस्त होती. त्यामुळे आमच्या पिढीसाठी ते रेडीरेक्नर होते. कोणतीही साहित्यिक शंका असो , एक फोन केला की, निरसन करायचे. त्यासंदर्भातील इतरही पुस्तकं वाचायला सांगायचे.आहार, विहार, विचार ,वाचन, निद्रा ठराविक वेळेतच ,आयुष्याला एक प्रकारची शिस्तबद्धता होती. प्रत्येक गोष्टीत अगदी जनसंपर्कापासून एक आखणी होती. त्यामुळे बहुआयामी व्यक्तिमत्त्व बनले.

कुणीही पुस्तकासाठी अभिप्राय लिहून मागितला की ओघवते विचार पटकन कागदावर उतरायचे. त्याचाही कधी गर्व नाही. अनेक विद्यार्थी प्रबंध मार्गदर्शनासाठी यायचे.ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत,तुकाराम गाथा,नामदेव गाथा मुखोद्गत! अनेक संस्कृत श्लोक मुखोद्गत आणि अर्थासह उत्तम विवेचन करायचे.नुसतेच अध्यात्मिक , तत्वज्ञानावरील ग्रंथ नाहीत तर क्रांतिकारकांची सुध्दा अनेक चरित्रं  व लेखन संग्रह त्यांच्याकडे आहे. स्वतः पोवाडा सादरीकरण उत्तम करायचे. शाहीर अमरशेख , गोविंद स्वामी आफळे यांचा प्रभाव त्यांच्यावर होता. इंग्रजी, मराठी, संस्कृत साहित्याची ग्रंथसंपदा अचाट!  गुरुदेव रानडे,रामकृष्ण परमहंस,विवेकानंद,टेंबे स्वामी यांच्या चरित्रांचे,विचारांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण ते करायचे. एक ना अनेक अशी अनेक पुस्तकं व त्यातील विचार त्यांच्या मुखातून ऐकणे ही एक पर्वणीच होती.विज्ञान आणि आधुनिक विचारसरणीचेही पुरस्कर्ते होते.

एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी गुणवैशिष्ट्यांचे दर्शन झाले तर भरभरून ते दाद देत असत. एखादी गोष्ट पटली नाही तर कोणाचेही ऐकायचे नाहीत. ते विद्यार्थी प्रिय होते.कडक शिस्तीचे पण तेवढेच मायाळू. माझे बाबा,  इंग्रजी व संस्कृत मधे मास्टर्स होते.तसेच अध्यात्मिक साहित्यातील त्यांना डॉक्टरेट मिळालेली होती. शासकीय तंत्रनिकेतन पुणे आणि कोल्हापूर याठिकाणी त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. कॉलेज मधे शिकवत असताना देखील अगदी सर्व व्यवस्थापन स्तरांतील लोकांशी स्नेहपूर्ण वागणे असे.माझी आजी व आई दोघीही उत्तम कविता करत असत  व अत्यंत सुगरण. माझ्या वडिलांकडे आम्ही लहान असल्यापासूनच विविध स्तरांतील लोकं येत असत.त्यामुळे समाजातील विविध विचारसरणी , स्वभाव विशेष यांचे अनुभव नकळतपणे स्पर्शून गेले.

अध्यात्मिक क्षेत्रांत ,विशेषतः ध्यानयोग व संतसाहित्याचे ते गाढे अभ्यासक होते. पावसचे स्वामी स्वरूपानंद त्यांचे गुरु.गुरूंबद्दल नितांत आदर आणि नित्योपासनेवर भर ! गुरूतत्व अवर्णनीय आहे, बुध्दिगम्य नाही. ते अंतरंगात अनुभवायचे आहे व सर्वव्यापी आहे असे ते म्हणत असत.परदेशातून देखील अनेक लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असत.संतचरित्रे व तत्वज्ञान  या विषयांवर भारतात अनेक ठिकाणी व्याख्यानमाला झाल्या. पारंपरिक सांस्कृतिक वाड्.मय,साधनमार्गातील साधकबाधक विचार, औपनिषदिक तत्वज्ञान, सिध्दांची चरित्रे, भारतीय तत्वज्ञानाला आधारभूत असलेला गीताबोध, संतवाड्.मय, आणि तौलनिक अभ्यास तसेच भारतीय मानसशास्त्राला धरून असलेली भगवान पातंजल योगसूत्रे यांचा अभ्यास त्यांनी सतत केला. आत्मभाव प्रगट करण्यास जी उपयोगी पडतात ती उपनिषदे असे ते म्हणत.शब्दांचे गूढार्थ सहजतेने सांगायचे व भाषेची भिती घालवून टाकायचे.शब्दबंबाळपणा , पोपटपंची कधीच आवडली नाही.भाषा कोणतीही असली तरी संस्कारित आणि चिंतनशील विचारसरणीतून तिचा वापर केल्यास ती ह्रदयाचा ठाव घेते त्यामुळे स्वयंअध्ययन , वाचन , मनन,चिंतन यावर त्यांचा विशेष भर असे.

इंग्रजी साहित्यातील जुन्या, नव्या प्रवाहांकडे पुन्हा पाहाणं, अभ्यासणं खूप आवडायचं.इंग्रजी कवितांचे अनुवादही उत्तम करायचे व संस्कृत साहित्यावरही तेवढेच प्रभुत्व व त्यावरही अनेक ठिकाणी व्याख्याने . विद्वत्ता ही आपलीच बाजू बरोबर आहे हे ठसवण्यासाठी वापरली जाते पण  आत्मविद् मनुष्य सर्वांत श्रेष्ठ ठरतो.त्याचा वाद संवादरूपच असतो परंतु, जेव्हा दुसरी व्यक्ती आपली बाजू मांडत असते तेंव्हा ती चुकीची असली तरी तो त्याचे म्हणणे खोडत बसत नाही. विचारांची ही एक बाजू असू शकते हे तो स्वीकार करतो.विविध पुस्तकांचे वाचन म्हणजे मनाने अनेक गोष्टींशी संपर्क साधणे, त्यात रत होणे असा प्रकार असतो.पुस्तके आत्मज्ञान देतात. अक्षरांचा सहवास जीवन संतुलित व समृद्ध करतो.देव हवा का नको हा प्रश्नच नाही केंव्हातरी स्वरूपावस्था अनुभवावीच लागते यासाठी ध्यानयोगाचे अनुसंधान आवश्यक आहे.

अनेक सत्पुरूषांच्या , सिध्दपुरूषांच्या भेटी तसेच अनेक विद्वान व्यक्तींबरोबर चर्चासत्रांत सहभागी होत असत.जगातील सर्व देवघेव ही लौकिकाशी निगडीत असते. अपेक्षाच केली नाही की अपेक्षाभंगाचे दुःख होत नाही. विश्लेषण किंवा संश्लेषण करण्यापेक्षा ज्ञानमार्ग व ध्यानयोग यामधे भावपिंड पुष्ट करावा असे ते सांगत असत. सत्कर्म करून ,कर्मसमर्पण प्रवृत्ति दृढ़ करावी . उत्तम अध्ययनाचा नेम, निश्चय आणि अट्टाहास हे त्यांचे ब्रीद होते. चमत्कारांचा तिटकारा होता. अवास्तव काहीतरी कथन करून आपण वेगळे करत आहोत हे वाटणे अत्यंत गैर आहे हे ते परखडपणे सांगत. वयाच्या सोळाव्या वर्षांपासून ‘गुरूचरित्र’ग्रंथाचे अखंड, अविरतपणे वाचन व गाढे अभ्यासक होते.जवळजवळ साठ वर्षे दर पौर्णिमेला नृसिंहवाडी येथे जात असत.हा नेम कधीही चुकला नाही.जिथं लीनता असते तिथंच तल्लीनता निर्माण होते. असे ते म्हणत.उत्तम दास झाल्यावरच सर्वोत्तम होता येते त्यामुळेच तर गुरूंवर नितांत प्रेम आणि श्रद्धा होती.

ते म्हणायचे,जगात विविध धर्म, विविध उपासना,मतमतांतरे चालतच राहणार आहेत.समाजप्रवाहाबरोबर प्रवास करताना स्वतःवर विश्वास हवा, तशी जडणघडण हवी, आपल्या कर्मावर निष्ठा हवी.निष्ठा एकदम निर्माण होत नाही. त्यासाठी संघर्षही करण्याची तयारी हवी.ओढाळ मनाला बांध घालता घालता मानसिक व शारीरिक कुचंबणा होते. नैराश्य, हताशपणा यामुळे धारणा बदलतात. जगाचा विचार करु नये.आपले आचार , विचार उत्तम कसे राहतील याचा अभ्यास करावा. सद्ग्रंथ व सत्संग सोडू नये.त्यांची ग्रंथसंपदा मोठी होती.निंदा, व्देष टाकून द्यावा. मृदु वचनाने बोलावे,नेटकेपणा व स्वच्छता असावी, कोणाला कमी लेखू नये.व्यवहारात दक्ष असावे. प्रारब्धावर बोलताना म्हणायचे, प्रारब्ध ही कर्मांची बेरीज असते.प्रयत्न हा आदिसंकल्पनानुसार सुरु राहतो.प्रारब्ध व्यापक आहे. प्रयत्न तात्कालिक व कार्यानुसार चालू राहतात. प्रयत्न देहांतापर्यंत असतात. प्रारब्ध देहांतानंतरही कार्य करते.

अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले होते. दिल्ली येथे जागतिक शांतता परिषदेस विशेष आमंत्रित केले गेले. अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. शंकराचार्य यांच्या हस्ते पुणे भूषण, कोल्हापूर भूषण मानपत्रांनी सन्मानित केले गेले. डॉ. पाठक प्रतिष्ठान ,मिरज यांचेतर्फे सांस्कृतिक पुरस्कार, अथर्व ज्ञानपीठची कोल्हापूर याठिकाणी स्थापना व ध्यानयोग आणि ज्ञानयोग याचे मार्गदर्शन. अहमदनगर येथे ज्ञानपीठ स्थापना, अखिल भारतीय किर्तनकुल यांचेकडून सन्मानपत्र, डॉक्टरेट इन स्पिरीच्युअल लिटरेचर ही पदवी. आकाशवाणी केंद्रावरून व दूरदर्शन वरून चिंतन व प्रबोधनपर व्याख्यानमाला.

आयुष्यभर एका ध्येयानी ते जगले. अशी माणसं आता खूप कमी बघायला मिळतात. सात्विक आहार,सतत लिखाण, मनन,चिंतन आणि पाठांतर यावर भर.चैतन्यधारा, साधकाचा प्रवास, हिरण्यपथ, समर्थ म्हणतात, स्वामीपाठ, नामसुधा,श्रीकृष्ण विजय , प्रचिती ,जे जे स्फुरले सहज, उपनिषद प्रत्यय, अक्षरब्रम्ह, ध्यानयोग , श्री गुरूचरण अशी अनेक ग्रंथ संपदा त्यांनी लिहिली. चौथे जग लिहिण्याचा त्यांचा मानस त्यांच्या आकस्मिक निधनाने अर्धवट राहिला. ‘ईश्वरेच्छा’, हे त्यांचे  अध्यात्मिक जीवनप्रवासाचे आत्मचरित्र आता प्रकाशनाच्या मार्गावर आहे. शेवटपर्यंत स्वाभिमानी आणि स्वावलंबी जीवन ते जगले.

मृत्युसुध्दा सहजच यावा कधीही कोणावर भार नको म्हणून कायम म्हणायचे,

अनायासेन मरणं, विनादैन्येन जीवनम्।
देहांते तव सान्निध्यम् , देही मे परमेश्वरः।

तसेच झाले विनासायास त्यांनी निरोप घेतला. जायच्या आदल्या दिवशी मी रात्री फोन केला तेंव्हा सुध्दा ‘गंगालहरी’पठणच सुरु होते. मी म्हंटले बाबा अजूनही वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी सुद्धा तुमचे उच्चार ऐकत रहावे असेच आहेत. मला म्हणाले अभ्यास आणि ध्यास याला वयाचे बंधन नाही. खरं आहे अगदी

अनेक अडचणींना, दुःखांना , जबाबदाऱ्यांना  त्यांनाही सामोरे जावे लागले , पण एकट्याने स्वबळावर विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. जीवनात अनेक तरंग आले, संताप झाला , चुका कबूल केल्या .अनेकवेळा ते एकटे पडले.पण प्रवाहित्व कायम ठेवले.शेवटपर्यंत लिखाण , वाचन यामधे सातत्य होते. व्रात्यपणाकडे वळणारा स्वभाव तसाच होता. इतरांची चेष्टा करायची आणि गंमत पाहायची असा बालसुलभ.त्यांच्या आयुष्यातील दुःखाच्या आणि परमोच्च आनंदाच्या क्षणांची मी साक्षी आहे. मला याचा अभिमान आहे. माझे बाबा माझे सर्वस्व होते व आहेत.  त्यांना जाऊन दहा महिने झाले.  आज अकरा जूनला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे संस्कार , विचार ,धारणा आणि जीवनप्रवास यांचे स्मरण करताना त्यांचे निर्व्याज प्रेम आठवते.

डॉक्टर गौरी मुंगळे-कहाते.