पुष्कळ वेळा असं म्हटलंय की, संताना व्यवहार कळत नाही . सुशिक्षित जगतातील हे भाष्य जेंव्हा कानावर येते तेंव्हा , गंमत वाटते. ज्ञानेश्वर यांच्यासारख्या संतांनी विवेकाच्या वाणीला महत्त्व दिले आहे. या वाणीला महत्त्व असण्याचे कारण ती चित्तशुद्धीसाठी उपयोगी पडत असते. संतांना व्यवहार कळत नाही असं म्हणण्यापेक्षा सर्व संत आपल्या साधन माध्यमातून निजव्यवहारात गुंतले होते असे म्हणावयास काय हरकत आहे?

संतांनी या विश्वाला स्वानंदाची कोठारे उघडून आनंद कसा घ्यावा हे शिकवलं आहे. आजकाल चहाची दुकाने, उपहारगृहे , मोठी हॉटेल्स सगळं पहावयास मिळते. सर्व प्रकारची तत्कालिक आनंद देणारी पेये बाजारात उपलब्ध आहेत. संतांनी अमृताचा हाट ( बाजार) भरवला होता, आहे व ते सततच भरवत राहणार आहेत.या बाजारात अमृताचा दर कोठेही नमूद केला नाही. अमृत कोठे ठेवले हे मात्र सांगितलेलं आहे. पण, त्या सांगण्याकडे लोकांचे लक्ष असतं असं नाही. याचं कारण देहभाव, विकारवशता मनाला चैन पडू देत नाही. भगवंताचे कीर्तन ऐकताना भगवंत हा विषय जेंव्हा डोक्यात चढतो तेंव्हा त्या कीर्तनाचे रूपांतर संकीर्तनात होते. येथे देणे घेणे काहीच नसते.देण्यासाठी द्रव्य नसेल आणि घेण्यासाठी हात नसतील तरीही चालतात. प्रेमाने ओथंबलेला भगवंत जेंव्हा साधक हृदयात स्थिर होतो तेंव्हा चंचल मनही शांत होते.

संतांच्या बाजारात झालेला नफा आमरण सरता सरत नाही. मृत्यूला आपल्या ढिगाऱ्याखाली गाडतो .अमृताचा बाजार ही केवळ कल्पना नाही भावविश्वातील ते एक सुंदर वास्तव आहे. हे अमृत समाजातील सर्वांस विपुलतेने उपलब्ध आहे. एकदा यती नारायणनंद सरस्वती आनंद “वृत्ती ” विषयी मला बोलताना म्हणाले, तुझ्याशी मला हितगूज करायचे आहे. म्हणजे शाश्वतही ज्यात असते अशी एक नित्य गोष्ट तुला सांगतो.ती सांगत असताना ते म्हणाले , अरे सांगतानाही जिभेचा गोडवा कमी होत नाही. डोळ्यात प्रेमाश्रू येतात, अंगावर काटे येतात , कंठ रुद्ध होतो आणि जग उगीचच भलत्या नादी लागले आहे असं वाटतं. मी म्हणालो, जगाचं जाऊ दे. आपलं गुपित सांगा. ते म्हणाले, तुला अमृत पाहिजे की दूध कोल्डड्रिंक? अमृत नाहीच तर ते देणार कुठलं? माझे उत्तर त्यांनी सांगितलं.रोज अत्यल्प का होईना ईश्वर चिंतनात मग्न होण्याची सवय ठेव. हे चिंतन मनाचे मंथन करते. या मंथनातून हळूहळू आनंद प्राप्त व्हावयास लागतो. संतांनी हा आनंद अनुभवला आहे म्हणूनच म्हणतात ,
“संत आनंदाचे स्थळ l संत सुखची केवळ l l
नाना संतोषाचे मूळ l ते हे संत l l
नाना संतोषाचे मूळ असं म्हणायचं कारण वृत्तींची विकारवशता भगवंत कमी कमी करत नेतो आणि आनंद प्रस्थापित करतो .

संतांच्या अमृताची बाजारपेठ सर्व विश्वाला उपलब्ध आहे. त्यात आड येणारी एकच गोष्ट ती म्हणजे विकारवशता. जो निराकार प्रकटही आहे, गुप्तही आहे तो भगवंताचा चैतन्य आविष्कार सद्भावतून गणला जातो. भक्तीने अनुभवता येतो, श्रद्धेने जोपासला जातो. स्वानंदाशी हातमिळवणी होत रहाते. फार तत्वज्ञानांच्या आहारी न जाता, आपल्या वागण्याबोलण्यात प्रेम प्रस्थापित केल्यास क्लेशरहित परमार्थ करता येतो.

डाव, प्रतिडावाच्या गाठी आपोआपच सुटतात व सन्मार्गातील अडथळे दूर होतात. व्यवहार करत असतानाच कर्तुत्व आपल्याकडे घेतले नाही तर व्यवहारही निदपाधिक होत राहतो. निदपाधिक याचा अर्थ सहजरम्य, क्लेशरहित असा घ्यावा.

आपण संतांच्या ” अमृत कोल्ड ड्रिंकहाऊस ” मधे जायचे ठरवल्यास व सत्संग करत गेल्यास त्याच्या वाटाही सुलभ होतात. अमृताच्या खुल्या बाजारपेठेतील अमृत आपण सेवत गेल्यास आनंद गगनात मावेनासा होतो. हे गगन म्हणजे आपल्याच मस्तकात सतत पुलकित होणारा सद्भाव होय !! हा भाव सर्वच अभाव नाहीसा करतो व तृप्ती देतो.

सद्गुरु श्री. गुरुनाथ मुंगळे.