नमस्कार,

मा. दीपकभाऊ , सौ. वसुताई आणि समस्त मानकर कुटुंबिय यांनी प. पू. टेंबे स्वामी महाराज आणि प. पू. बाबा यांच्या मूर्ती आणि पादुकांची प्रतिष्ठापना
प. पू. वामनानंद स्वामीसरस्वती महाराज आणि प.पू. वासुदेवानंद सरस्वती , वाराणसी आणि बल्लाळेश्वर यांच्या हस्ते, दिनांक १४ मे २०२३ रोजी केली.अनुपम्य असा सोहळा अनुभूति पूर्ण होता.

समग्र जीवनाचा, प्रत्येक श्वासाचा, प्रत्येक कृतीचा आणि प्रत्येक भावाचा नैवेद्य ‘त्याला’ अर्पण करणे म्हणजेच ‘आत्मनिवेदन’ , सख्यम, दास्यम व आत्मनिवेदन हे भक्तीतील आंतरिक भाव आहेत. नवविधा भक्तीचीच ही परमोच्च अवस्था . आजचं तेथील वातावरण यापेक्षा वेगळं नव्हतं. ती परमोच्च अवस्था सर्वांनी अनुभवली हे निःसंशय!!

प. पू. बाबा कायम म्हणायचे आधी ” तो ” मग “मी” असा तुमचाही भाव जेंव्हा होईल ,तेंव्हा तुम्हाला या भगवंताच्या निरतिशय प्रेमाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी शरणागतीचा अवलंब करा . नित्य सेवा , नाम, साधना आणि संस्कारशील आचरण यातून आत्मप्रचीती निश्चितच प्राप्त होते पण, त्यासाठी अट्टाहास हवा.ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग व भक्तिमार्ग आहेत पण, सर्वश्रेष्ठ आणि आपल्यासारख्या सामान्य जनांना जमणारा भक्तिमार्ग आहे.

मी भगवंताचा आहे. अशी खरी जाणीव होणे याचे नाव भक्ती.

आज या भक्ती मार्गाचीच प्रचिती श्री दीपकभाऊ , वसुताई आणि समस्त मानकर कुटुंबीयांनी दिली. अत्यंत भावपूर्ण अशा वातावरणात आणि मंत्रोच्चारात झालेल्या या सोहळ्याचं कौतुक शब्दातीत आहे.त्यांच्या हातून घडलेलं कार्य हे आत्मकल्याणकारी आहे.

डॉ गौरी मुंगळे – कहाते