संत साहित्य व अध्यात्माचे गाढे अभ्यासक सद्गुरु डॉ. गुरुनाथ मुंगळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार प्रदान करण्यासाठी सात लाख
रुपयांचा निधी देऊन त्यांच्या कुटुंबीयांनी शिवाजी विद्यापीठावर मोठा विश्वास दाखविला आहे. त्या अनुषंगाने लवकरच कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी येथे दिली.

डॉ मुंगळे यांच्या कन्या डॉ. गौरी कहाते यांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवाजी विद्यापीठात ‘स्व. सद्गुरु गुरुनाथ मुंगळे आध्यात्मिक तत्वज्ञान साहित्य पुरस्कार देण्यासाठी सात लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. कहाते म्हणाल्या, “माझे वडील डॉ. मुंगळे इंग्रजी, संस्कृत विषयांतील तज्ञ होते. १९९९ पर्यंत त्यांनी अध्यापन केले. सोबतच संतसाहित्य अध्यात्म यांचा अभ्यास व लेखन केले त्यातून त्यांनी लिहिलेली १५ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल व्यक्त केलेले मनोगत २५ डिसेंबरला कोल्हापूर येथे प्रकाशित करण्यात येत आहे. डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने (मुंबई) त्यांना डि. लीट. मानद पदवी दिली. त्यांना कोल्हापूर भूषण, पुणे भूषण, ऋग्वेद भूषण आदी पुरस्कारांनीही सन्मानित केले आहे. ६ ऑगस्ट 2020 ला त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सदर पुरस्कार द्यावा. “प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव, डॉ. विलास शिंदे, डॉ. अजय देशपांडे उपस्थित होते.