अथर्व ज्ञानपीठ प्रतिष्ठान कोल्हापूर व स्वर्गीय दिगंबर बुवा कुलकर्णी स्मृती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, “कविवर्य कुसुमाग्रज जयंती” आणि “मराठी भाषा गौरव दिनानिमित्त” माननीय विघ्नेश जोशी यांच्या, “मराठी आमुची मायबोली” या, कार्यक्रमाचं आय.एम.ए हॉल सोलापूर ,या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं.

डॉ गौरी कहाते आणि श्री.संदीप कुलकर्णी यांच्या ट्रस्ट तर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. हा एक अप्रतिम, मंत्रमुग्ध करणारा असा कार्यक्रम होता . नामवंत कलाकार श्री. विघ्नेश जोशी यांनी श्रोत्यांना दीड तास मराठी साहित्याचा, रंगभूमीचा, नाट्याचा ,नामवंत लेखक, कवी यांचा पट उलगडत अक्षरशः मंत्रमुग्ध केले. मानापमान या नाटकातील नांदी संवादिनी वर वाजवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्या नंतर साहित्यातील किस्से, गमती जमती,कविता ,गद्य आदींचा ओघ ! राम गणेश गडकरी, पु .ल, व.पु.आचार्य अत्रे, गदिमा,बा.भ.बोरकर, विद्याधर गोखले, बाळ कोल्हटकर, द .मा.मिरासदार, वसंत कानेटकर, मोरोपंत, संत साहित्य, बाल गंधर्व आणि अर्थातच कुसुमाग्रज आदी दिग्गजांच्या विषयी  माहिती, आठवणी, स्वभाव विशेष आपल्या ओघवत्या आणि अस्खलित शैलीत सादरीकरण केले. भाषेवरील प्रभुत्व अप्रतिम ! मराठी भाषा विकसित करण्यासाठी जास्तीत जास्त साहित्य, आपली सांस्कृतिक परंपरा तरुण पिढी पर्यंत पोहोचवली पाहिजे. तरुण वर्गाची उपस्थिती अशा कार्यक्रमांना आवर्जून हवी अशी आशा व्यक्त केली. आपलं  साहित्य हे मनाला एकत्र बांधणारं,एकत्र साधणारं , एकत्र आणणारं आहे. अनेकांचं यासाठी अनन्य साधारण योगदान आहे.

समाज हा संस्कृतीच्या वातावरणात जिवंत राहतो आणि हे सांभाळण्याचं ,समाजात रुजवण्याचं काम साहित्य करतं.आपली विचारांची बैठक यामुळेच तयार होते. कित्येक उदाहरणातून आजही किती मनावर श्रेष्ठ साहित्याचा प्रभाव आहे हे लक्षात येतं.